वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक. . .

मुख्य पान / वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक


अनंत चतुर्दशीला निघणारी पारंपारिक मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीतील हजारो गणेशभक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला व इमारतींवर गर्दी करतात.अत्यंत शिस्तबद्ध आयोजनात तरुण-तरुणी व आबालवृद्ध ढोल ताशाच्या व हलगीच्या तालावर लेझीम खेळत असतात.काही मुले पारंपारिक वेशात मिरवणुकीत सामील होतात.पालखीत विराजमान श्रीं च्या मुर्तीच्या मागे भजनी मंडळ असते व बाजूला भालदार,चोपदाराच्या वेशातील कार्यकर्ते अब्दागिरी व चौरया ढाळत असतात.श्रीं च्या मुर्तीला ओवाळण्यासाठी प्रत्येक इमारतीशी गृहिणी उभ्या असतात,तसेच अनेक इमारतींमध्ये मिरवणूकीत सामील झालेल्यांसाठी सरबत,पाणी तसेच काही ठिकाणी बिस्किटे,पोहे अशी सोय करण्यात आलेली असते.गुलाल न उधळता आयोजलेल्या या मिरवणुकीस डोंबिवली पोलीस स्टेशनचा शिस्तबद्ध मिरवणुकीचा सन्मान अनेक वर्षे मिळालेला आहे.दोन वर्षे महिलांच्या अभूतपूर्व उत्साहाने आयोजिलेले लेझीम पथक व एक वर्षी आयोजिलेले झांज पथक आणि मागील वर्षी आयोजिलेले झांज व लेझीम पथक मिरवणूकीचे आकर्षण ठरले आहे.यावर्षी महिलांचा उत्साह खूप आहे त्यामुळे झेंडा,लेझीम व ढोल अशी पथके बसवण्याचा मानस आहे.

पूर्वापार परंपरेप्रमाणे श्रीं चे विसर्जन झाल्यानंतर मंडळातर्फे दिला जाणारा महाप्रसाद- नगरातील स्त्रियांनी एकत्र येऊन बनवलेले ४० टे ४५ किलो दडपे पोहे,काकडीचे काप व पेढा असा महाप्रसाद खाऊन व थंडगार सरबत पिऊन तृप्त मनाने सर्व गणेशभक्त आपापल्या घरी परततात.