मंडळाचे उपक्रम. . .

मुख्य पान / उपक्रम


दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करताना आधीचे सुरु झालेले उपक्रम मंडळातर्फे क्वचितच बंद करण्यात आले.मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारे इयत्ता ४थी व ७वी स्कॉलरशिप मार्गदर्शन व सराव परीक्षा,दिवाळीत आयोजिण्यात येणारी किल्ले बांधणी स्पर्धा,उत्सव सत्रात आयोजिण्यात येणारी अभिनव प्रदर्शने,अभिनव संकल्पनेतून साकारलेली रक्तगट सूची,वसंतोत्सव,वेगवेगळ्या गुणवत्ताप्राप्त विविध अंगातील टिळकनगरातील व्यक्तींचा सन्मान,१५ ऑगस्ट रोजी होणारे ध्वजवंदन हे असे अनेक उपक्रम मंडळातर्फे सलग १४ टे १५ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत व डोंबिवलीकरांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.वेगवेगळ्या आपत्तीच्या काळातही मंडळ नेहमीच धावून गेले आहे ज्यामध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेली नगराची साफसफाई व २६ जुलैच्या आपत्तीच्या वेळी जमा केलेली मदत,त्याला दिलेली नागर्वासियांनी उत्स्फूर्त साथ व त्या मदतीचे नियोजनबद्ध केलेले वाटप आजही टिळकनगरवासियांच्या स्मरणात आहे.त्याप्रमाणे डोंबिवलीतील वेगवेगळ्या,मोठमोठ्या उपक्रमांत व कार्यक्रमांत मंडळाचा सहभागही डोंबिवलीकरांनी पाहिला आहे.

१९९२ सालापासून "शारदीय संगीत महोत्सव" त्यानंतर १९९५ सालापासूनच्या "वसंत व्याख्यानमाला"ज्यामध्ये आयोजिलेल्या विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांच्या दहा दिवसांच्या पाच प्रवचनमाला,सु.ग.शेवडे यांची सात दिवसांची आद्य क्रांतिकारकांवरील प्रवचनमाला तसेच वेगवेगळ्या प्रतिथयश वक्त्यांची भाषणे आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात आहेत.सन २००० पासून मंडळातर्फे वसंत व्याख्यानमाला व गणेशोत्सव सत्रातील कार्यक्रम हे एकत्रितपणे १ मे च्या आसपास "वसंतोत्सव" या नावाने आयोजिण्यास सुरवात करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिथयश वक्त्यांची भाषणे,मुलाखती व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.विनामूल्य सादर करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवाने डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात वादळ निर्माण केले आहे.अनेक ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावंकर,संगीतकार श्रीनिवास खळे,गीतकार कै.जगदीश खेबूडकर,कै.प्रभाकर पणशीकर,मेग्यासेसेपुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.नेटके आयोजन,अनेक अंतर्मुख करणारे विषय,तसेच कार्यक्रमाच्या सादरीकरणातील अनोख्या कल्पना यामुळेही वसंतोत्सव डोंबिवलीकरांच्या मनात घर करून आहे व त्यामुळेच डोंबिवलीकर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात असतात.

२०१३चा वसंतोत्सव हा श्री.सुरेश खरे व श्री.कमलेश भडकमकर यांनी सादर केलेल्या मराठी साहित्याला लाभलेल्या १६ वसंताचा विशेष कार्यक्रम सदर झाला.तसेच दुसऱ्या दिवशी 'जादूची पेटी' हा श्री.आदित्य ओक व श्री सत्यजित प्रभू यांनी पेटीचा इतिहास उलगडणारा कार्यक्रम सादर केला.वसंतोत्सवाची सांगता 'गीतबहार'या जुन्या अजरामर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने झाली यात सुप्रसिद्ध संगीत संयोजन श्री.अजय मदन व त्यांच्या सहकार्यांनी सादर केले.

२०१२ मधील पं.यशवंत देवांचा 'देवगाणी' हा कर्यक्रम ,पं.उपेंद्र भट व जयतीर्थ मेवुंडी यांचा भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या सांगितीक योगदानावर आधारलेला "गुरु:साक्षात स्वर ब्रह्म"हा कर्यक्रम,वसंत देसाई यांची सांगितीक कारकीर्द दाखविणारा 'स्वर वसंत'व चौथ्या दिवशी आयोजिलेल्या सारेगम फेम बासरीवादक अमर ओक यांचा "अमर बन्सी" हा कार्यक्रम त्याच्या साथीस असलेले सारेगम मधील वादक या सर्वांमुळे एक विशेष उंची गाठून गेला.

मंडळातर्फे काही विशेष कार्यक्रमांचे आयोजनही अत्यंत वाजवी दरात किंवा मोफत करण्यात येते ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाने येऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा हा उद्देश असतो.डॉ.सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा "सहा तासांचा आयुष्यावर बोलू काही" या कार्यक्रमाने डोंबिवलीकरांना अत्यंत वाजवी तिकीट दरात,जेवणासह दर्जेदार कार्यक्रम कसा आयोजित व सादर केला जाऊ शकतो याची चुणूक मंडळाने दाखवली.उपस्थित १२०० रसिकांची पिण्याच्या पाण्यापासून टे जेवणापर्यंतची केलेली सोय व मध्यंतरात पाच मिनिटांत १२०० रसिकांपर्यंत पोहोचलेले जेवण हे एक उत्कृष्ट Event Management चे उदाहरण आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात आहे.पूर्वाश्रमीचे डोंबिवलीकर व जागतिक शांतीदूत म्हणून जगात प्रसिद्ध असलेले श्री.संदीप वासलेकर यांची "एका दिशेचा शोध" या त्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम व डॉ.सलील कुलकर्णी यांच्या "लपवलेल्या काचा" या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम व त्यामध्ये उपस्थित १० नावाजलेल्या कलाकारांची अदाकारी या दोन कार्य्क्रमांचाही विशेष उल्लेख करावा लागेल.यावर्षी शताब्दी राष्ट्र्गीत्ताची या ५००० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गायलेल्या संपूर्ण राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.